शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका!
याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देवू शकत नाही जर तुम्हाला या संदर्भात प्रतिक्रिया हवी असल्यास आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
मुंबई -: गोवंडी येथील पालिकेच्या पं. मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील तत्काळ शस्त्रक्रिया विभागाच्या छतातून सांडपाणी गळत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले असून प्रशासन शस्त्रक्रिया विभागाच्या सोयीसुविधांसाठी किती संवेधनशील आहे हे यावरून दिसून येत आहे. छतातून गळत असलेल्या सांडपाण्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याची होत असलेली गळती व छताच्या प्लास्टरचे काम त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश सचिव सुभाष मराठे यांनी दिला आहे.
गोवंडी येथील पालिकेचे शताब्दी रुग्णालय विविध कारणांसाठी नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहे. डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची कमतरता तर बंद अवस्थेत असलेले वैद्यकीय सामुग्री यासारख्या अनेक कारणांसाठी शताब्दी रुग्णालय चर्चेत आहे. सध्या या रुग्णालयात थोडीफार सुधारणा होत असताना तत्काळ शस्त्रक्रिया विभागात छतातून सांडपाणी गळती होत असल्याचे समोर आले आहे. शताब्दी रुग्णालयाच्या तळमजल्यावर तत्काळ शस्त्रक्रिया विभाग असून यामध्ये शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रक्रिया विभागाच्या आतमध्ये प्रवेश करताच तीन खोल्या लागतात. त्यातील पहिल्या वातानुकुलीत खोली मध्ये शस्त्रक्रिया केली जाते तर इतर दोन खोल्यांमध्ये चेंजिंग रूम व शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टर व त्यांचे सहकारी वॉश अप करतात ती खोली आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर वॉशअप करतात त्या खोलीच्या छतामधून सांडपाण्याची गळती होत आहे. या शस्त्रक्रिया विभागाच्या वरती पहिल्या मजल्यावर लहान मुलांचा बालरुग्ण विभाग असून त्याच्या बाथरूममधून सांडपाण्याची गळती होत आहे. सांडपाण्याची गळती एवढ्या मोठ्या होत असून छतातून येणारे पाणी जमिनीवर साचू नये म्हणून येथील कर्मचाऱ्यांना त्या जागी प्लास्टिकची बादली ठेवण्याची वेळ आली आहे. तरीही गळती होत असलेले सांडपाणी या तिन्ही खोल्यांच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेवर साचत आहे. तर शस्त्रक्रिया होत असलेली वातानुकुलीत खोली वगळता शस्त्रक्रिया विभागातील छपरावरील अनेक ठिकाणाचं प्लास्टर कोसळलेले असून पंखेही बंद अवस्थेत आहेत. शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, गोवंडी भागातील गोरगरीब रुग्ण उपचार घेत असून शस्त्रक्रिया विभागाच्या झालेल्या या अवस्थेमुळे एखाद्या रुग्णाचा बळी गेल्या नंतरच पालिका प्रशासनाला जाग येईल काय असा प्रश्न येथे येणारे रुग्ण करत आहेत. दरम्यान शताब्दीचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री जाधव यांच्याशी प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
===========================
शस्त्रक्रिया विभागाच्या बाहेरच रुग्णांच्या नातेवाईकांना थांबवले जाते. पण ज्यावेळी या शस्त्रक्रिया विभागाचा दरवाजा उघडला जातो त्यावेळी आतमध्ये साचलेले सांडपाणी बाहेर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिसते. या साचलेल्या सांडपाण्यातून रुग्णाला शस्त्रक्रिया खोलीमध्ये नेले जाते. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रिये दरम्यान व झाल्यानंतरही संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही उपाययोजना केली जात नाही. येत्या आठ दिवसात याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी तर्फे मोर्चा काढण्यात येईल.
- सुभाष मराठे (निमगावकर)
सचिव मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सचिव मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- डॉ. राजश्री जाधव, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय.