मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा उपाहारगृहात घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने उपाहारगृहांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गॅस सिलेंडर जप्त करणे, हॉटेलबाहेरील अनधिकृत बांधकाम पाडणे, अनधिकृतरीत्या वाढवलेले स्वयंपाकगृह, गच्चीवरील शेड तोडणे अशा रीतीने उपनगरातील उपाहारगृहांवर सोमवारी कारवाई करण्यात आली असून, याच कारवाई अंतर्गत कुर्ल्यातील नऊ उपाहारगृहे सीलबंद करण्यात आली आहेत.
पहिल्या दिवशी ‘एल’ वॉर्डमधील उपाहारगृहांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या उपाहारगृहांमध्ये दर्शन हॉटेल, मंजुनाथ फास्ट फूड, सीताराम टी शॉप, रामेश्वर वडापाव सेंटर, सावना फिनिक्स, एशिया बार, अॅरोमास कॅफे, आयडल हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, मोतीमहल रेस्टॉरंट, पंचवटी गौरव, जनता लंच होम, शिवसागर फूड, एचएनएस लिमिटेडचा समावेश आहे.
उपनगरात कारवाई करण्यात आलेल्या उपाहारगृहांमध्ये स्मॉल हॉटेल, भगत ताराचंद, सरदार पावभाजी, बोनोबो रेस्टॉरंट, जसलोक, भरत, प्रसन्न, आकाश स्वीट्स, आरटीओ कॅन्टीन, कतील रेस्टॉरंट, सीसीडी, श्रीनाथजी हॉटेल, बालाजी फूड्स, चायना गेट रेस्टॉरंटचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या कारवाई अंतर्गत गॅस सिलेंडर्स, शेगड्या व टेबल-खुर्च्या, ओव्हन, इलेक्ट्रीक शेगडी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अंधेरी पश्चिमेकडील आकाश स्वीट्स येथील मोकळ्या भागातील अनधिकृत शेड तोडण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील उपाहारगृहावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ७ गॅस सिलेंडरसह ३ टेबल, ८ खुर्च्या, भांडी, १० स्टील रॅक्स जप्त करण्यात आले.
अंधेरी येथील जे.पी. मार्गावरील कटील उपाहारगृहाची तात्पुरती शेड जमीनदोस्त करण्यात आली. येथून २ गॅस सिलेंडर, १० खुर्च्या, ३ लाकडी टेबल, १ फ्रीज, १ स्टील काउंटर असे साहित्य जप्त करण्यात आले. याच धर्तीवर मालाडमधील हॉटेल श्रीनाथजी, बालाजी फूड्स यावर कारवाई करण्यात आली.