उपहारगृहातील अग्निसुरक्षेबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2015

उपहारगृहातील अग्निसुरक्षेबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना लागू


मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध उपहारगृहांमध्ये खाद्य पदार्थ, पेयपान आदींचा आस्वाद घेणा-या नागरिकांची सुरक्षितता जपली जावी, तसेच उपहारगृहातील अग्निसुरक्षा अधिकाधिक परिपूर्ण असावी, या करिता महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे सुधारीत मार्गदर्शक सूचना व कार्यपध्दती तातडीने अंमलात आणली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यपध्दती टप्पेवार, सुलभ व काल सुसंगत करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपहारगृहात गॅस सिलेंडर्स किती असावेत व कसे ठेवावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील सर्व उपहारगृहांच्या प्रवेशद्वारावर सदर उपहारगृह अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याबाबतचा फलक ठळकपणे लावण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.


दि. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी कुर्ला परिसरातील एका उपहारगृहात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील सर्व उपहारगृहांची तपासणी महापालिकेद्वारे करण्यात येत असून यामध्ये अग्निसुरक्षा विषयक बाबींची तपासणी देखील करण्यात येत आहे. महापालिकेद्वारे उपहारगृहांची करण्यात येत असलेल्या तपासणी दरम्यान अनेक उपहारगृहांमध्ये अनधिकृत सिलेंडर्सचा साठा आढळून आला आहे. गॅस सिलेंडर्सचा साठा करण्याबाबत तसेच उपयोग करण्याबाबत योग्य ती काळजी न घेतल्यास ते धोकादायक ठरु शकते.

या सर्व बाबी लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे सुधारीत मार्गदर्शक सूचना व कार्यपध्दती तातडीने अंमलात आणण्यात येत आहे. या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने व्हाव्यात, यासाठी सदर सूचनांची माहिती उपहारगृहांच्या संघटनांना कळविण्यात येत आहे. त्याचबरोबर गॅस (एल.पी.जी. / पी.एन.जी.) पुरवठादार कंपन्यांना देखील सुधारीत सूचनांची माहिती कळविण्यात येत असून अंमलबजावणीबाबत सदर कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.
विशेष म्हणजे ज्या उपहारगृहातील अग्निसुरक्षा परिपूर्ण असेल त्या सर्व उपहारगृहांच्या प्रवेशद्वारांवर ''हा परिसर अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे'' (THIS RESTAURANT IS FIRE SAFETY COMPLIANT) असा संदेश असलेला व किमान ७५ मीमी पेक्षा अधिक आकाराच्या अक्षरात असलेला फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उपहारगृहात जातांना अग्निसुरक्षा विषयक फलक असलेल्या उपहारगृहाला भेट द्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.

महापालिकाक्षेत्रातील प्रत्येक उपहारगृहातील आकारमानानुसार व संबंधित बाबींच्या सापेक्ष त्या उपहारगृहात किती 'गॅस सिलेंडर' असावेत व कशाप्रकारे ठेवले जावेत, तसेच उपहारगृहामध्ये परिपूर्ण अग्निसुरक्षा कशी असावी, याबाबत जारी करण्यात आलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत असून सर्व संबंधितांनी सदर मार्गदर्शक सूचनांचे परिपूर्णपणे पालन करावे, असेही आवाहन मुंबई अग्निशमन दलाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS