पालिकेच्या रुग्णालयातील चुकीच्या उपचाराने २० वर्षीय प्रमोदचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2015

पालिकेच्या रुग्णालयातील चुकीच्या उपचाराने २० वर्षीय प्रमोदचा मृत्यू

मृत्यूची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी  
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालयात ३ जुलै रोजी ताप आल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या प्रमोद घाडगे या २० वर्षीय मुलावर टीबी झाल्याचे सांगून उपचार करण्यात आले. उपचारावेळी लावण्यात आलेल्या सलाईनमुळे प्रमोदला रक्ताच्या उलट्या झाल्यावर त्याला त्वरित शिवडीच्या टीबी रुग्णालयात पाठवण्यात आले रुग्णालयात दाखल करताच प्रमोदचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करून प्रमोदला न्याय द्यावा अशी मागणी प्रमोदचे वडील बबन घाडगे यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयात प्रमोद घाडगे या 20 वर्षाच्या मुलाला 3 जुलै 2015 ला ताप येत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्या केल्या प्रमोदचा एक्सरे काढून सलाईन लावण्यात आले. सलाईन मधून दिलेल्या इंजेक्शन आणि औषधांमुळे प्रमोदला रक्ताच्या उलट्या झाल्या. प्रमोदला टीबी झाल्याचे सांगून ताबतोब शिवडीच्या टीबी रुग्णालयात पाठवण्यात आले. शिवडीच्या टीबी रुग्णालयात जाताच काही वेळातच प्रमोदचा मृत्यु झाला आहे. प्रमोदवर संत मुक्ताबाई रुग्णालयात मार्च महिन्यात ताप आल्याने उपचार करण्यात आले परंतू यावेळी त्याला टीबी झाल्याचे निष्पन्न झाले नाही. 29 जूनला ताप आला आणि ताप कमी न झाल्याने 3 जुलैला मुक्ताबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रमोदला टीबी झाल्याने त्याची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टीबी झाल्याचे समजल्यावर प्रमोदला खाजगी रुग्णालयात घेवून जातो असे सांगुनही शिवडीच्या टीबी रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रमोदला टीबी झाला नसल्याचा दावा प्रमोद्चे वडिल बबन घाडगे यांनी केला आहे.

प्रमोदचा एक्सरे बदलला आहे. त्यावरून उपचार करण्यात आले. यामुळे चुकीची औषधे दिल्याने प्रमोदचा मृत्यू झाल्याचा आरोप बबनघाडगे यांनी केला आहे. प्रमोदचा पोस्टमार्टम करण्याची मागणी करूनही पोस्टमार्टम करण्यात आले नसल्याने तसेच त्याचा एक्सरे शिवडीच्या टीबी रुग्णालयाकडून लपवून ठेवला गेल्याने प्रमोदच्या मृत्यू बाबत संशय निर्माण होत असल्याचे बबन घाडगे यांनी सांगितले आहे. प्रमोदच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बबन घाडगे यांच्या वतीने खासदार रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, मुंबईच्या महापौर, पोलिस आयुक्त इत्यादींना पत्र दिले आहे. खासदार रामदास आठवले यांच्या पत्राच्या अनुषंगाने महापौरांनी १८ सप्टेंबरला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना प्रकरणाची पडताळणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रमोदच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर पालिका कारवाई करणार कि हे प्रकरण दाबून टाकणार असा प्रश्न बबन घाडगे यांनी उपस्थित केला आहे.  

Post Bottom Ad