मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महापालिका कर्मचारा-यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत १००० पेक्षा अधिक कर्मचा-यांनी /त्यांच्या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या सुमारे तीन महिन्याच्या कालावधीत १,६१,५५,६०८/- इतकी रक्कम संबंधित कर्मचा-यांना / ‘कॅशलेस’ असल्यास संबंधित रुग्णालयास महापालिकेने नियुक्त केलेल्या विमा कंपनीद्वारे देण्यात आली आहे. तर गेल्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत दाव्यांची एकूण रक्कम सुमारे ६ कोटी इतकी झाली आहे.
याच भूमिकेचा भाग म्हणून १ ऑगस्ट, २०१५ पासून महापालिका कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली आहे. या विमा योजनेमुळे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ४००० रुग्णालयांमध्ये ही सेवा ‘कॅशलेस’ स्वरुपात उपलब्ध आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ३२० प्रमुख खाजगी रुग्णालयांमध्ये देखील ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये महापालिका कर्मचारी / त्यांचे कुटुंबीय यांना रु. ५,००,०००/- पर्यंतच्या रुग्णालयातील खर्चास संरक्षण मिळणार आहे. या वैद्यकीय विमा योजेनेचा लाभ महापालिकेच्या १,११,४६६ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना होत आहे. विशेष म्हणजे १ एप्रिल, २०११ पासून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना व त्यांच्या कुटुंबियांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत १५,४०७ निवृत्तीवेतन धारकांपैकी केवळ ८४७ निवृत्तीवेतन धारकांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. ही संख्या तुलनेने अतिशय कमी आहे. १ एप्रिल, २०११ पासून निवृत्त झालेल्या कर्मचा-याचे निधन झाले असल्यास संबंधित कुटुंब निवृत्तीवेतन धारक देखील या योजनेअंतर्गत नाव नोंदणीसाठी अर्ज करु शकणार आहे. त्यामुळे अधिकाधिक निवृत्तीवेतन धारकांनी / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून या विमा योजनेसाठी नाव नोंदणी करण्याची विहित प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिका प्रशासानाद्वारे करण्यात आले आहे. या विमा योजेनेअंतर्गत गेल्या दोन महिन्यात ‘कॅशलेस’ व प्रतिपूर्ती (Reimbursement) या दोन्ही पध्दतींनी एकूण रुपये ५,९९,८७,८२६/- इतके दावे प्राप्त झाले आहेत.यापैकी रु. १,६१,५५,६०८/- इतक्या दाव्यांचा परतावा देण्यात आला असून इतर दाव्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे.या वैद्यकीय विमा योजनेसंबंधी विस्तृत माहितीसाठी महापालिका मुख्यालयासह महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये उघडण्यात आलेल्या विशेष कक्षाशी संबंधितांना संपर्क साधता येईल. या योजनेबाबतची माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment