मुंबई / प्रतिनिधी - बोनस किंवा सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार की, बेस्ट प्रशासनाचा तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी होणार; या गोष्टीचा निर्णय सोमवारी संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी बेस्ट कर्मचारी कृती समितीचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांची बैठक होणार असून त्यानंतर संध्याकाळी कृती समितीची सभा होणार आहे. या सभेदरम्यान कृती समितीचा अंतिम निर्णय कर्मचाऱ्यांना सांगितला जाईल. मात्र प्रशासनाबरोबरची चर्चा कामगारांच्या बाजूने न झाल्यास बेस्टचे कामगार सोमवारी रात्रीपासूनच संपावर जाणार आहेत.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान वा बोनस मिळालेला नाही. यंदा तरी दिवाळी ‘प्रकाशमान’ जावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी लावून धरली होती. मात्र उपक्रमावर आधीच कर्जाचा डोंगर असून कामगारांचे पगार देण्यासाठीही उपक्रमाला कर्ज काढावे लागते, ही वस्तुस्थिती मांडत बेस्ट प्रशासनाने याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर बेस्ट कामगारांच्या संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून संपाचा इशारा दिला होता. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांना विचारले असता, कर्मचाऱ्यांना आम्ही उपक्रमाची सत्य परिस्थिती सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांना बोनस देणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही मुंबईकरांना सेवा देऊ शकतो. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी बेस्ट उपक्रमाच्या बाजूने उभे राहावे. उपक्रमाची परिस्थिती सुधारल्यावर मिळणारा नफा कर्मचाऱ्यांमध्येच वाटला जाईल, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. बेस्टचे कर्मचारी समजूतदार असून ते नक्कीच उपक्रमाच्या पाठीशी ठाम उभे राहतील. बैठकीत या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment