मुंबई / प्रतिनिधी - अंधेरी पश्चिम परिसरातील एसिक नगर जवळील लिंकरोडच्या पदपथावर असणा-या 'मुंबई तवा' या स्टॉलवर महापालिकेच्या के / पश्चिम विभागाद्वारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने या स्टॉलवर कारवाई करु नये यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वेाच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी फेटाळली होती. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी (दि. ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी) त्वरीत कारवाई करत महापालिकेने सदर स्टॉल निष्कासित केला आहे.
याप्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संबंधित अनुज्ञापन धारकाने अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे महापालिकेने त्यांना वर्ष २०११ मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधित अनुज्ञापन धारकाने शहर दिवाणी न्यायालयात नोटीसीला आव्हान दिले होते. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर संबंधितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी मा. उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर संबंधितांद्वारे मा. सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा दि. ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी सर्वेाच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूनेच निकाल दिला. यावेळी सर्वेाच्च न्यायालयामध्ये महापालिकेच्या के /पश्चिम विभागाच्या अनुज्ञापन खात्याचे एस. एम. मांजरेकर व आर. एस. गावडे उपस्थित होते. सदर निकालानंतर महापालिकेच्या के / पश्चिम विभागाने सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांच्या मार्गदर्शनात निष्कासनाची कारवाई केली.
No comments:
Post a Comment