मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्यामध्ये विविध नागरी सेवा–सुविधा व संबंधित कार्यवाही योग्यप्रकारे पार पाडली जाऊन सुयोग्य समन्वय साधला जावा, यासाठी दर महिन्याला परिमंडळ स्तरावर नियमित बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता व पोलीस आयुक्त (मुंबई) अहमद जावेद यांनी दिलेल्या आदेशानुसार दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी प्रत्येक परिमंडळ स्तरावर समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त अजोय मेहता व पोलीस आयुक्त (मुंबई) यांच्यात एक विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकी दरम्यान महापालिका व मुंबई पोलीस यांच्यातील सुसंवाद व समन्वय वृध्दींगत व्हावा या दृष्टीने अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान महापालिका व मुंबई पोलीस खाते यांच्यामध्ये समन्वयात्मक सुसंवाद साधला जाण्यासाठी एका निश्चित कार्यपध्दतीची आवश्यकता असण्याची गरज लक्षात आली. यानुसार आता दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी सकाळी १०.०० वाजता परिमंडळ स्तरावर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच चौथ्या गुरुवारी सुटी असल्यास सदर बैठक त्यानंतर येणा-या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळाचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त / पोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठक होणार आहे. ही बैठक पहिल्या महिन्यात महापालिकेच्या संबंधित परिमंडळीय उपायुक्तांच्या कार्यालयात, तर दुस-या महिन्यात पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात या पध्दतीने आलटुन–पालटुन दोन्ही ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment