मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविताना रस्त्यांचा दर्जा, गुणवत्तेवर प्राधान्याने लक्ष द्या- पंकजा मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2015

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविताना रस्त्यांचा दर्जा, गुणवत्तेवर प्राधान्याने लक्ष द्या- पंकजा मुंडे

मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निर्माण होणारे रस्ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात यावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी राज्यातील अभियंते तसेच ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 
मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम भवन येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रत्येक विभागातील काही उपअभियंता यांची कार्यशाळा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची प्रभावी बांधणी आणि अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, रस्त्यांअभावी विकासापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याच्या उद्देशानेच ग्रामविकास विभागामार्फत ही योजना सुरु करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानानंतरचा राज्य शासनाचा हा दुसरा महत्वाकांक्षी आणि फ्लॅगशिप प्रोग्राम ठरणार आहे. राज्यभरातील सर्व संबंधित अधिकारी, अभियंते यांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी नियंत्रण कक्ष
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत. रस्त्यांच्या गुणवत्तेवर विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या पण दूरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी करताना ती वरवरची न करता मुळापासून करणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्या रस्त्याचा दर्जा अधिक काळ टिकेल, असे त्यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत रस्ते दर्जोन्नतीसाठी 30 हजार किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार किलोमीटरच्या लांबीवर काम करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांत उर्वरित लांबीवर टप्प्या टप्प्यात काम करण्यात येणार आहे. नवीन रस्त्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील रस्त्यांची दर्जोन्नती यासाठी पुढील पाच वर्षांत अंदाजे 13 हजार 828 कोटी रुपयांचा निधी लागेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad