मुंबई (प्रतिनिधी)- बेस्ट उपक्रमाचा सन २०१५- १६ अर्थ संकल्प स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर आज सभागृहात मंजूरीसाठी ठेवण्यात आला. पालिकेच्या पुढील महासभेत यावर चर्चा होणार असून यानंतरच अर्थसंकल्पाला अंतिम मंजूरी मिळणार आहे. या मंजूरीनंतर बेस्टची बसभाडेवाढ अमंलात येणार आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी या पूर्वी सदर अर्थ संकल्प स्थायी समितीपुढे मंजूरीसाठी ठेवला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाली होती. त्यानंतर हा प्रस्ताव महासभेत मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष फणसे यांनी सभागृहात मांडला. त्यानंतर सभागृहात यावर चर्चा करण्यात येणार आहे. सदर अर्थ संकल्प दोन टप्प्यात १ ते ३ रुपयांची भाडेवाढ सुचविण्यात आली आहे. तसेच पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहात या अर्थ संकल्पावर चर्चा करताना या भाडेवाढीस विरोधकांकडून विरोध होण्याची शक्याता आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.