मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची दूसरी लाइफलाईन म्हटली जाणाऱ्या बेस्ट मध्ये अनेक घोटाळे झाले असून या सर्व घोटाळ्यांची सीआयडीकडून चौकशी करावी अशी मागणी मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यानी पालिका सभागृहात केली. ते बेस्टच्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी बोलत होते.
बेस्टवर कर्ज असून बेस्ट सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने बेस्टने दरवाढ करण्याचे जाहिर केले आहे. या दरवाढीला सेना भाजपा महायुती कारणीभुत असल्याचा आरोप आंबेरकर यानी केला आहे. बेस्टने कोट्यावधीची कंत्राटे दिली आहेत. कंत्राटे मिळाली तरी या कंपन्यांनी कामेच केली नसल्याने बेस्टचे पैसा वाया गेला असल्याने बेस्ट आर्थिक मंदी मध्ये आल्याचे आंबेरकर यांनी म्हटले आहे. बस डेपो मधे अनेक विकासाची कामे सुरु आहेत. परंतू या कामामधून उत्पन्न मिळवायची सत्ताधारी आणि प्रशासनाची मानसिकता नसल्याचे आंबेरकर यानी म्हटले आहे.
बेस्ट मधील घोटाळ्यांवर क्यागने ताशेरे ओढलेले आहेत. या अहवालाकडे अधिकारी आणि सत्ताधारी दुर्लक्ष करत विकासकाना फायदा करून देत आहेत. बेस्ट मध्ये इलेक्ट्रिक सब स्टेशनचा १७७ कोटींचा घोटाळा झाला आहे याची चौकशी केली जात नाही. बेस्टमधे कैझन घोटाळा, विज चोरी प्रकरण, पवन उर्जा घोटाळा, गोराई बिच येथील कमीशन घोटाळा, केएलजी, विजमीटर, जाहिरात कंत्राट, क्यानेडीयन वेळापत्रक इत्यादी अनेक घोटाळे झाले आहेत. तरीही अधिकाऱ्यांना सत्ताधारी सांभाळून घेत असल्याने बेस्टला आर्थिक नुकसान होत असल्याचे आंबेरकर यानी म्हटले आहे.