मुंबईच्या पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून या तिनही मार्गावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची रिपब्लिकन पक्षाचे (ए) शिष्टमंडळ भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.के. जैन यांनी आज दिली.
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सातत्याने काहीना काही तांत्रिक बिघाड होऊन वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा जबरदस्त फटका नेहमी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूकच विस्कळीत होत असल्याने संतप्त प्रवाशांकडून रेल्वेची तोडफोड, मोटरमनला दमदाटी करणे आदी प्रकार घडतात. मध्य रेल्वे मार्गावरील विस्कळीत वाहतूक नेहमीच डोकेदुखी ठरत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा मोठा भार आहे. कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली ही मोठी लोकसंख्या असलेली ठिकाणे मध्य रेल्वे मार्गावर असल्याने साहजिकच वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उठतो. शिवाय मध्य रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाऱ्या गाड्यांबरोबरच व इतरही लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस ये-जा करीत असतात. त्यामुळे मध्य रेल्वे मार्ग नेहमीच व्यस्त असतो. त्यातच ओव्हरहेड वायर तुटणे, रूळावर गाड्या घसरणे अशा घटना घडत असतात.
मध्य रेल्वे मार्गावर वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा व यावर तातडीने उपाययोजना करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, यासाठी आरपीआयचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे पी. के. जैन यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रातील रेल्वे खाते महाराष्ट्राला मिळालेले असल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून मुंबई शहर, उपनगराबरोबरच संपूर्ण राज्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण रेल्वे मार्गांचा कायापालट करून त्यामध्ये आमूलाग्र बदल घडावा, अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली आहे