मुंबई ( जेपीएन न्यूज ) : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणाऱ्या महाराष्ट्रीय उद्योजकीय संस्थेने मंगळवारी ‘उद्योगबोध २०१५- सीमोल्लंघन’ या कार्यक्रमाची घोषणा संस्थेचे संस्थापक इं.माधवराव भिडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे भरलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक दुगाडे, सहसचिव नरेन्द्र बगाडे, सहसचिव सुहास नांदुर्डीकर, संस्थेचे जनसंपर्क प्रमुख गिरीश टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
९ आणि १० जानेवारी २०१५ रोजी कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात यंदाचा उद्योगबोध होणार आहे. या कार्यक्रमास वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई हे नॉलेज पार्टनर तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर हे सह आयोजक म्हणून लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे प्रमुख प्रायोजक आहेत तर हावरे बिल्डर्स, नातू परांजपे, इशान डेव्हलपर्स, भिडे असोशिएट्स आदी सहप्रायोजकाच्या भूमिकेत असतील. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रीय उद्योजकांनी सामील व्हावे असे आवाहन इं.माधवराव भिडे यांनी यावेळी केले.