मुंबई : सरकारी खात्यातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला(एसीबी) आता '१0६४' या हेल्पलाइनची मोठी मदत होऊ लागलीआहे. तीन महिन्यांपूर्वीच कार्यान्वित केलेल्या या हेल्पलाइनला संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला असून मागील तीन महिन्यांच्या अवधीत हेल्पलाइनवर २६९९ जणांनी कॉल्स केल्याची माहिती उजेडात आली आहे.
एसीबीने ऑक्टोबर महिन्यात '१0६४' ही हेल्पलाइन कार्यान्वित केली. राज्याच्या कोणत्याही विभागातील 'भ्रष्ट' सरकारी नोकर लाच मागत असेल तर त्या कर्मचारी-अधिकार्याविरोधात या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यास मुभा आहे. त्यामुळे या हेल्पलाइनवर संपूर्ण राज्यभरातून कॉल्स येऊ लागले आहेत. या हेल्पलाइनच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे एसीबीने गेल्या तीन महिन्यांत २७ वेळा यशस्वी सापळे रचून लाचखोर सरकारी अधिकारी-कर्मचार्यांना गजाआड केले. यापैकी ६ सापळे नागपूरमध्ये, २ भंडार्यात, ११ गोंदियात तर सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, अमरावती या ठिकाणी प्रत्येकी एक, तर मुंबई शहरात ३ सापळे रचण्यात आले. दक्ष नागरिकांनी हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर त्या तक्रारकर्त्या नागरिकाच्या विभागातील एसीबी कार्यालयाला कारवाईचे निर्देश दिले जातात. या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञानाच्या अधिक वापरावर भर देत असल्याचे एसीबीचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. २0१४ मध्ये लाचखोरीला आळा घालण्यासाठी रचलेल्या सापळ्यांचे प्रमाण २0१३च्या तुलनेत ११४ टक्क्यांनी अधिक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले