मुंबईत कामाच्या वेळा बदला - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2015

मुंबईत कामाच्या वेळा बदला - रेल्वे मंत्री सुरेश प्रभू

दिवा रेल्वे स्थानकातील हिंसक आंदोलनाने उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या समस्या 'फास्ट ट्रॅक'वर आल्या असून आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक घेतली. यावेळी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलल्यास लोकल सेवे वरील ताण टाळता येईल, अशी महत्त्वाची सूचनाही प्रभूंनी केली. 

मुंबईची 'लाइफ लाइन' असलेली लोकलसेवा गेल्या काही काळापासून ट्रॅकवरून भरकटलेली आहे. आधीच जीवघेण्या गर्दीने कोंडमारा होत असताना रोजच्या रखडपट्टीला चाकरमानी वैतागले आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावर तर गाड्यांचे वेळापत्रक सतत कोलमडलेलेच असते. याच गोंधळामुळे दिवा, डोंबिवली या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांमधील असंतोषाचा उद्रेक झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभू यांनी मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घातले आहे. प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर विस्तृत चर्चा केली. लोकलचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर विविध अंगानी या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. 

यावेळीच प्रभू यांनी कार्यालयीन वेळांमुळे लोकलवर येणारा ताण अधोरेखित केला. विविध सरकारी, खासगी कार्यालयांची कामकाजाची वेळ एकसारखी असल्याने एकाचवेळी लोकलसेवेवर गर्दीचा ताण येतो. कामाच्या वेळा वेगवेगळ्या केल्यास हा गर्दीचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल. त्याशिवाय नियंत्रित गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण घटेल आणि प्रवासही सुलभ होईल, असा दावा प्रभू यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत सरकार अनुकूल कार्यवाही करेल असे सांगितले. तसेच राज्याच्या रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत दर तीन महिन्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.

Post Bottom Ad