मंत्रालयीन कर्मचार्‍यांसाठी नवीन नियमावली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2015

मंत्रालयीन कर्मचार्‍यांसाठी नवीन नियमावली

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : मंत्रालयातील सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना आता ते सकाळी जेवढे उशिरा कामावर येतील तितका काळ संध्याकाळी अधिक वेळ थांबून काम करावे लागणार आहे. राज्य सरकारने त्याबाबतचा निर्णय जारी केला असून नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून हा नियम लागू होणार आहे. लांबून येणार्‍या कर्मचार्‍यांना अनेकदा कामावर पोहोचण्यास होणारा उशीर लक्षात घेता ही सवलत देण्यात आली आहे.

मंत्रालयातील बहुतांश सरकारी कर्मचारी हे मुंबई उपनगरांत तसेच मुंबईबाहेरच्या कल्याण, कसारा, कर्जत, पनवेल आदी शहरांत राहतात. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा बिघाड, पाऊस वा अन्य कारणांमुळे वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही. सरकारी कार्यालयीन वेळ ही सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे ते संध्याकाळी ५ वाजून ३0 मिनिटे अशी आहे. कर्मचार्‍यांना हजेरी नोंदविण्यासाठी १0 मिनिटांचा ग्रेस पीरियड देण्यात येतो. हा १0 मिनिटांचा ग्रेस पीरियड संपल्यानंतर कर्मचारी उशिरा आल्यास २ उशिरांनंतर तिसर्‍या उशिरास त्याची नैमित्तिक रजा कापण्यात येते. मात्र सार्वजनिक वाहन व्यवस्थेने येताना होणारा उशीर लक्षात घेता कार्यालयीन वेळेत लवचिकतेची सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे आता १ जानेवारी २0१५ पासून शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यासाठी ६0 मिनिटांच्या लवचिकतेची सवलत देण्यात आली आहे. 

मात्र सवलत दिली असली तरी कर्मचार्‍याला त्याच्या कामाचे तास पूर्ण करावेच लागणार आहेत. कर्मचारी जितका उशिरा येईल तेवढे संध्याकाळी साडेपाचनंतर अधिक काळ थांबून काम करावे लागणार आहे. उशीर केलेला वेळ त्यास भरून द्यावा लागणार आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी-कर्मचारी हा दररोज जेवणाची वेळ धरून ७.४५ तास काम करतो. मात्र विधानमंडळ, न्यायालयीन प्रकरणे आदी कामांचे महत्त्व लक्षात घेता आवश्यकतेनुसार त्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबणे हे बंधनकारकच राहणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS