मुंबई- महाराष्ट्रीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करता यावी, त्यांच्या उत्पादन आणि सेवांना जागतिक स्तरावर बाजारपेठ मिळावी या उद्देशाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने ९ आणि १० जानेवारी रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे ‘उद्योगबोध-२०१५’ या आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषदेचे आयोजन केले आहे.
या आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषदेत जागतिक स्तरावरील विविध देशांचे उद्योजकीय शिष्टमंडळे, व्यापारी संघटना सामील होणार आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, उत्पादन, औषधे, माहिती तंत्रज्ञान, आदरातिथ्य, सेवाक्षेत्र आदी क्षेत्रांतील नामवंत उद्योजक, व्यावसायिक आणि तंत्रविशेषज्ञांची मांदियाळी असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योजकांना या सर्वांना व्यक्तिश: भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपापले उत्पादन वा सेवांना निवडक समूहाच्या प्रमुखाला दाखविता येणार आहे. नवीन व्यवसायाची दालने आपणांसाठी खुले होण्याची शक्यता यादरम्यान नाकारता येत नाही. आपला ब्रॅण्ड मोठ्या संख्येने इतरांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य आहे हे यावेळच्या उद्योगबोधचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती संस्थापक इं.माधवराव भिडे यांनी दिली.
अहमदनगर मध्ये राहून युरोपसह जगभरातल्या ३५ देशांमध्ये आपलं कॅरॅमल कलर्सचं उत्पादन पोहोचविणारे दीपक चांदोरकर, औरंगाबाद येथे स्थायिक होऊन अमेरिकेतील बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल स्टील व्यवसायाला १०० टक्के सेवा देणाऱ्या एकमेव स्टीलएस्टीमेटींग.कॉम या कंपनीचे सर्वेसर्वा संजीव शेलार, क्विकहीलच्या माध्यमातून जगभरात संगणक क्षेत्रात मराठी माणसाचा ठसा उमटविणारे कैलास काटकर, यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सल्लागार विवेक परांजपे, टाटा इंटरनॅशनलचे सल्लागार विरेन्द्र गुप्ते, सिमेन्सचे माजी बोर्ड मेंबर विजय परांजपे, शार्प इंडियाचे टोमिओ इसोगाई, सिग्मा इलेक्ट्रीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन जोशी आदी मान्यवरांचं मोलाचं मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे, अशी माहिती सॅटर्डे क्लबचे विश्वस्त अशोक दुगाडे यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रीय उद्योजकांनी सामील व्हावे असे आवाहन इं.माधवराव भिडे यांनी केले असून आगाऊ नोंदणीसाठी संस्थेच्या संकेतस्थळास भेट देण्याची सूचना सहसचिव नरेन्द्र बगाडे आणि जनसंपर्क प्रमुख गिरीश टिळक यांनी केली.