पालिकेत नोकरीचे आमिष देऊन लुबाडणार्‍या दोघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2015

पालिकेत नोकरीचे आमिष देऊन लुबाडणार्‍या दोघांना अटक

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन बेरोजगार व गरजूंची फसवणूक करणार्‍या दोघांना पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील दक्ष सुरक्षारक्षकांनी व अधिकार्‍यांनी पकडले. या ठगांना भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दुकलीने नोकरीचे आमिष देऊन दोन लाख रुपये उकळल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

एफ/दक्षिण विभाग कार्यालयात व परिसरात काही दिवसांपूर्वी दोन तरुण संशयित अवस्थेत फिरताना आढळून आले होते. तेथील सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी हटकले आणि चौकशी केली. त्यांच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात बोगस मुलाखत पत्रे व बनावट अर्ज, नोंदणी पत्र मोठय़ा संख्येने सापडली. रवींद्र पवार आणि प्रकाश गायकवाड अशी या दोघा तरुणांची नावे असून त्यांनी पालिकेत नोकरीची आवश्यकता असणार्‍यांना नोकरीचे आमिष दाखवले आणि बोगस मुलाखत पत्रे देऊन त्यांच्याकडून एक ते दीड लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले. तक्रार दाखल झाल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईकरांनी अशा खोट्या आमिषाला बळी न पडता तोतया टोळीपासून सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS