मुंबईच्या सात किनारपट्टय़ांवर १00 जीवरक्षक तैनात ठेवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2015

मुंबईच्या सात किनारपट्टय़ांवर १00 जीवरक्षक तैनात ठेवणार

मुंबई : शहरातील चौपाट्यांवर जीवरक्षकांची वानवा असल्यामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर तोडगा म्हणून समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेमार्फत लवकरच हा निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईतील विविध किनार्‍यांवर १00 जीवरक्षक नेमण्याची जबाबदारी या खाजगी संस्थेवर सोपवण्यात येणार आहे.

मुंबईच्या चौपाट्यांवर सहलीसाठी अथवा मौजमजा करण्यासाठी तरुण-तरुणी येत असतात. कित्येकदा समुद्रात पोहण्यास गेलेल्या अतिउत्साही तरुणांचा बुडून मृत्यू होतो. मागील काही दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या मुंबईतील सात चौपाट्यांवर ३६ जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. जीवरक्षकांची संख्या वाढवण्यासाठी कोळी बांधवांची जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्याची योजना यापूर्वी अग्निशमन दलाने आखली होती. मात्र, पोहण्यात निष्णात असणारे उमेदवारच न मिळाल्याने आणि या योजनेला फारसा प्रतिसादच न मिळाल्याकारणाने ही योजना बारगळली.

काही वर्षांपूर्वी महिला जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता; पण उमेदवारांनीच पाठ फिरवल्यामुळे ही योजनादेखील फोल ठरली. 'खासगी संस्थेमार्फत जीवरक्षक नेमण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यासाठी खासगी संस्थेला नियमावली आखून देण्यात येणार असून हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ही नियमावली आखून झाल्यानंतर याबाबत निविदा मागवण्यात येतील. नेमणूक करण्यात आलेल्या संस्थेमार्फत जीवरक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील चौपाट्यांवर जीवरक्षक पुरवणार्‍या कित्येक खासगी संस्था आहेत,' असे उपमुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगडळे यांनी सांगितले.

Post Bottom Ad