मुंबईत एखाद्याचे निधन झाल्यास तो मृतदेह मुंबईबाहेर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी नेताना दूक्खीत कुटुंबियांची होणारी तारांबळ होऊ नये म्हणून पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक या तीन मोठय़ा रुग्णालयांमध्ये 'पोर्टेबल' शीतपेट्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे. या मागणीसाठी ठरावाची सूचनाही देणार असल्याचे आंबेरकर यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
व्यवसाय किंवा कामानिमित्त मुंबईत वर्षानुवर्षे स्थायिक झालेल्या व्यक्तीेंचे निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक पार्थिव गावी नेतात. पण मूळ गाव दूर अंतरावर असल्यास देहाची हेळसांड होण्याची भीती असते. ती टाळण्यासाठी मृतदेह अशा शीतपेट्यांमधून गावी नेल्यास त्याची हेळसांड होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र या 'पोर्टेबल' शीतपेट्या खाजगीच उपलब्ध आहेत. यासाठी आकारण्यात येणारे भाडे अवाजवी असते. काहीजणांच्या तर ते आवाक्याच्या पलीकडेही असते. अशा व्यक्तींसाठी महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे असे सांगताना, आपण त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. अशा खाजगी शीतपेट्यांसाठी किमान पाच हजार रुपये भाडे आकारले जात असून, वाहतूक खर्चही वेगळा मोजावा लागतो.