लोकलमध्ये वर्षभरात ३ कोटींचे स्मार्टफोन चोरीला - विशेष पथक स्थापन करण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

लोकलमध्ये वर्षभरात ३ कोटींचे स्मार्टफोन चोरीला - विशेष पथक स्थापन करण्यात येणार

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : लोकलमध्ये मोबाईल (स्मार्टफोन) चोरांचा सुळसुळाट झाला असून गेल्या वर्षभरात तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीचे मोबाईल या भामट्यांनी लांबवल्याचे उघडकीस आले आहे. या मोबाईल चोरांना शोधून काढणे हे रेल्वे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असून यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. 

दिवसेंदिवस लोकलमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले, गदरुल्ले, भिकारी यांच्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतानाच आता मोबाईल चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. गेल्या वर्षभरात मोबाईल चोरीच्या १ हजार ३४३ घटना घडल्या आहेत. चोरीला गेलेल्या या मोबाईलची किंमत सुमारे २ कोटी ७१ लाख इतकी आहे. २0१३ मध्ये मोबाईल चोरीच्या ९७१ घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये १ कोटी ३७ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. 

मोबाईल चोरांना शोधणे जिकिरीचे असल्यामुळे याबाबत रेल्वे पोलिसांचा विचारविनिमय सुरू आहे. मोबाईल चोरीला गेल्यास त्याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले जातात आणि त्या पोलिसांमार्फत गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो. यापुढे मात्र या गुन्ह्यांचा तपास विशेष पथकाकडे देण्यात येणार असून प्रत्येक पोलीस ठाण्याशी समन्वय साधून हे पथक तपास करेल, असे रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले. 

मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोबाईल कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. चोरीला गेलेल्या अथवा हरवलेल्या मोबाईल फोनचा आयएमईआय क्रमांक मोबाईल अपलोड केल्यास चोरट्यांना जेरबंद करणे शक्य होईल, असे रेल्वे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS