'त्या' शाळांवर कारवाईची मनविसेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2014

'त्या' शाळांवर कारवाईची मनविसेची मागणी

मुंबई ( जेपीएन न्यूज ): पूर्व प्राथमिक शाळांच्या प्रवेशावरून दरवर्षी उडणारा गोंधळ लक्षात घेऊन यंदा शिक्षण संचालकांनी नव्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याची सूचना शाळांना दिली होती. मात्र, राज्यातील अनेक शाळांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रवेश दिला आहे. यामुळे अनेक पालकांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. सूचना धुडकावून शाळा प्रवेश देणार्‍या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी मनविसेने केली आहे. यासंबंधी मनविसेने शिक्षण महासंचालकांना निवेदन सादर केले आहे.

पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेशासाठी पालकांची नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात फरफट होते. त्यामुळे या वर्गांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी एक महिन्याच्या काळात करावेत, या दृष्टिकोनातून राज्य शिक्षण संचालकांनी आदेश काढले होते. त्यानुसार लवकरच वेळापत्रक जाहीर करून सर्व शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले होते. मात्र, शाळांनी प्रशासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रवेश सुरू दिला आहे.मुंबईतील वडाळा,माटुंगा,दादर तसेच उपनगरातील अनेक नामांकित शाळांनी प्रवेश प्रक्रियेची जाहिरात देण्यास प्रारंभ केला आहे. वडाळ्यातील गर्ल्स हायस्कूलमध्ये पालकांना १६ डिसेंबरला प्रवेश अर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची मुलाखतही घेण्यात आली, असा आरोप काही पालकांनी केला आहे. मुंबईतील इतर अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालक गोंधळून गेले आहे. त्यामुळे शाळा प्रवेशासाठी पालकांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी शिक्षण संचालनालयाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केली आहे. या शाळांवर कारवाई करावी, शाळा प्रवेशसंबंधी परिपत्रक काढून सर्व शिक्षणाधिकार्‍यांना सूचना द्याव्यात व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मनविसेने शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे केली आहे.

Post Bottom Ad