मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमीद्वारे 'मुंबई' या विषयावर खुल्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्त छायाचित्रकार व मुंबई महानगरपालिका कर्मचारी अशा गटांमध्ये आयोजित या स्पर्धेसाठी मुंबई महानगरातील दैनंदिन जीवन, सण, उत्सव, बाजार, आरोग्य सेवा, शैक्षणिक जीवन, वाहतूक, समुद्रकिनारा, उद्याने, मुंबईतील इमारती, वास्तुशिल्पे, प्रार्थना स्थळे अशी विविधांगी कलात्मक छायाचित्रे आवश्यक व अपेक्षित आहेत.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट छायाचित्रास ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे, तर द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांस अनुक्रमे ४ आणि ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येकी २ हजार रुपयांची ३ उत्तेजनार्थ पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. छायाचित्रे ८ बाय १२ अथवा १0 बाय १२ इंच या आकारात असावीत. प्रत्येक स्पर्धक रंगीत अथवा कृष्णधवल प्रकारातील ४ छायाचित्रे पाठवू शकतो. या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २0१४ अशी आहे. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दादर (पूर्व) परिसरातील हिंदू कॉलनी, ल. न. मार्गावरील महापालिका शालेय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील कक्ष क्र. २0७ मधील संगीत कला अकादमीच्या कार्यालयात नियम व अटींनुसार सादर करणे आवश्यक आहे.