शिवाजी पार्कवर रिपाइंच्या दोन गटांत हाणामारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2014

शिवाजी पार्कवर रिपाइंच्या दोन गटांत हाणामारी


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी अवघ्या देशभरातून जनसागर दादर येथील चैत्यभूमीवर लोटला असतानाच रिपाइंच्या दोन गटांत हाणामारी झाल्याच्या प्रकाराने गालबोट लागले. रिपाइंच्या दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे शिवाजी पार्क परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.


या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना पांगवत २00 जणांना ताब्यात घेतले. तसेच काही कार्यकर्तेही या वेळी जखमी झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो भीमसैनिक शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन करत असतानाच दुसरीकडे रिपाइंचे दोन गट एकमेकांमध्ये भिडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रिपाइं नेते रामदास आठवलेंच्या गटाने सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासाठी उभारलेल्या स्टेजच्या शेजारी सेक्युलर रिपाइंच्या गटाचाही स्टेज उभारण्यात आला होता. 

सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी सेक्युलर रिपाइं गटाच्या कार्यकर्त्यांनी आठवलेंवर टीका करत प्रक्षोभक विधाने केली. हिंदुत्ववादी भाजपामध्ये आठवले गट विलीन झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या कारणामुळे आठवले यांचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी याबाबतचा जाब विचारण्यासाठी सेक्युलर रिपाइंच्या स्टेजकडे धाव घेतली. त्या वेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे काही क्षणातच पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी २00 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

या प्रकारानंतर या ठिकाणी रिपाइंच्या वरिष्ठ नेत्यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. काही वेळेतच येथील परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे शिवाजी पार्क परिसरात काही काळ तणाव झाला होता. पोलिसांनी देखील या घटनेनंतर दादर परिसरात बंदोबस्तात वाढ करत अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्कता राखली. या वेळी काही कार्यकर्ते किरकोळ स्वरूपात जखमी झाले. या घटनेनंतर शिवाजी पार्कमध्ये जमलेल्या आंबेडकरी जनतेमध्ये गटा-तटाच्या राजकारणावर संताप व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया उमटत होत्या

Post Bottom Ad