मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने सन २००९-१० पासून दोनदा आर्थिक तरतूद वाढवूनही मागील ५ वर्षात प्रवेशाची संख्या ११ टक्क्यांनी कमी झाली आहे. शिक्षण क्षेत्रात आलेल्या उदासीनते मुळे शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे असे असे प्रजा फौंडेशनच्या श्वेत पत्रिकेत म्हटले आहे.
सन २००९-१०मध्ये ६७४७७ विद्यार्थ्यांनी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला त्यापैकी ३९६८८ विद्यार्थ्यांनी २०१३-१४मध्ये शाळा सोडली. २१ टक्के विद्यार्थी २०१३-१४ मध्ये इयत्ता पाचवी पर्यंत पोहचू शकलेले नाहीत. मागील ५ वर्षात पहिल्या इयत्तेतील प्रवेश ३७ टक्क्यांनी घटले आहे. पालिका शाळांमधून पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ६७ टक्के असून खाजगी शाळांमधून पास होणाऱ्या मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे असे अहवालात म्हटले आहे.
पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. पालिका प्रशासकीय प्रक्रिया आणि शिक्षणाचा दर्जा यासंदर्भात काही संबंधित प्रश्न विचारण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये १५७ नगरसेवकांनी शिक्षण विषया संदर्भात एकही प्रश्न विचारलेला नाही. या वर्षभरात केवळ ६ नगरसेवकांनी शिक्षणाशी संबंधित ४ पेक्षा जास्त प्रश्न विचारले अशी माहिती प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी पत्रकारांना दिली.