मुंबई - कर्नाटक सरकारच्या जुलमी वरवंट्याखाली भरडल्या जाणार्या सीमाबांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुंबईत राहणार्या सीमावासीयांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील सीमाबांधवांना एकत्र आणून अखंड महाराष्ट्र घडविण्यासाठी त्यांनी दुसर्या सीमालढ्याची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांपासून केंद्र सरकार ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा तीव्र केला जाणार असून ‘अखंड महाराष्ट्र अभियान’ या मुंबईकर सीमाबांधवांनी हाती घेतले आहे. त्यासाठी १४ डिसेंबर रोजी चर्चगेट येथील विद्यापीठ विद्यार्थी भवन येथे लाखो सीमाबांधव एकत्र येतील.
सीमाभागात कन्नडिगांकडून मराठी बांधवांवर भयंकर अत्याचार सुरूच आहेत. मराठी असूनही कानडीची सक्ती. मग तो प्रवेश अर्ज असो किंवा निवेदन, सर्व काही कानडीतूनच करावे लागत आहे. बेळगावचे नाव बदलून बेळगावी करण्यात आले आहे. मराठी बोलल्यास पोलीस तसेच सरकारकडून प्रचंड अत्याचार सहन करावा लागत आहे. सीमावासीयांना या यातनांतून सोडविण्यासाठी सनदशीर आंदोलने, संघटनात्मक कार्य आणि सर्वोच्च न्यायालयातील लढाई यापलीकडे जाऊन महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील सीमाबांधवांना एकत्र आणून एकजुटीची वज्रमूठ उगारली जाणार आहे.