डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2014

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना - मुख्यमंत्री

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येत्या ६ डिसेंबर रोजी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानात करावयाच्या विविध उपाययोजना आणि पुरवण्यात येणार्‍या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीस सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना दिली जाईलच याशिवाय या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीदेखील करण्यात येईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला या वेळी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने या वेळी मुख्यमंत्र्यांकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री महोदयांनी या दिवशी महासंचालनालयामार्फत जाहिरात देण्यात यावी, अशा सूचना विविध विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था ठेवावी, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखो नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. तसेच मध्य रेल्वेमार्फत ६ विशेष गाड्या आणि कोकण रेल्वेमार्फत २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर मध्य रेल्वे ५ व ६ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत कुर्ला, ठाणे, कल्याण याबरोबरच वाशी, पनवेल येथे जाण्यास विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबरोबरच सोलापूरकरिता विशेष गाडी सोडता येत असल्यास रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात यावी, अशा सूचनाही मध्य रेल्वेच्या संबंधितांना दिल्या. 

मुख्यमंत्र्यांनी या वेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवश्यक असणार्‍या सर्व सोयीसुविधांचा आढावा घेतला. मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी येथे करण्यात येणार्‍या सोयीसुविधांची या बैठकीत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस, बेस्ट, परिवहन विभागामार्फत ६ डिसेंबरच्या आधी आणि नंतर पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या वेळी पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याचे आदेश या वेळी दिले. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या.

बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, वित्त विभागाचे प्रधान सचिव छत्रपती शिवाजी, नगरविकास विभाग (२)चे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास खारगे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, सामजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, मुंबईच्या जिल्हाधिकारी शैला ए., माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

Post Bottom Ad