नवी दिल्ली- देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवण्याऐवजी त्यांच्या पदरात महागाईचा मोठा बोजा टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. इंधन दरात वाढ झाल्याचे कारण देऊन प्रवाशांवर भाढेवाढ लादण्याची तयारी रेल्वे खात्याकडून सुरू झाली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांच्या खिशात पुन्हा हात घालण्यात येणार आहे.
रेल्वेने इंधनावर आधारित भाडे ठरवण्याचे धोरण ठरवले आहे. यानुसार प्रवासी आणि माल वाहतुकीच्या भाडय़ाची सुधारणा करण्यात येते. जून २०१४ मध्ये प्रवासी वाहतुकीत ४.२ टक्के तर मालवाहतुकीत १.४ टक्के भाडेवाढ झाली होती. आता डिसेंबरमध्ये भाडय़ाची फेररचना होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे भाडेवाढ होणे गरजेचे आहे, असे रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही नुकत्याच एका कार्यक्रमात रेल्वे भाडेवाढीचे संकेत दिले होते. प्रवाशांना या भाडेवाढीचा काही भार स्वीकारावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
रेल्वेचा खर्च वाढत आहे. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा हव्या असल्यास त्यांना अधिक भाडे द्यावे लागेल. आपण सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. रेल्वेत मोठी गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना त्याचा भार सोसावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करावी लागेल. रेल्वेचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ६ ते ८ लाख कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रभू यांनी सांगितले.
रेल्वे प्रवाशांची घटलेली संख्या ही चिंतेची कारण बनली आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ५६६२.५४ दशलक्ष तिकीटे विकली गेली होती. यंदा ५५८१.३३ दशलक्ष तिकीटे विकली गेली.