मुंबई पोलीस दलाचे तीन अतिरिक्त झोन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2014

मुंबई पोलीस दलाचे तीन अतिरिक्त झोन

मुंबई ( जेपीएन न्यूज ): शहरातील बेसुमार वाढणार्‍या लोकसंख्येमुळे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तीन अतिरिक्त झोन स्थापन करण्यात येणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. 

मुंबईतील रस्त्यांवर घडणार्‍या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विभागीय कार्यालयांची संख्या १२ वरून १५ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरात ९३ पोलीस ठाणी आहेत. ही सर्व पोलीस ठाणी १२ क्षेत्रीय पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारित येतात. प्रत्येक उपायुक्ताच्या कार्यक्षेत्रात सात ते आठ पोलीस ठाणी येतात. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर प्रत्येक उपायुक्तांच्या अखत्यारित पाच ते सहा पोलीस ठाणी येतील. 'सध्या हा प्रस्ताव प्राथमिक स्वरूपातच आहे. वाढती लोकसंख्या विशेषत: उपनगरे आणि उत्तरेकडील लोकसंख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. उपायुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांची संख्या कमी झाल्यास पोलीस दलावर नियंत्रण मिळवणे आणि ते हाताळणे सोपे जाईल. त्यामुळे हे शहर अधिक सुरक्षित बनेल,' असे मारिया यांनी सांगितले. 

परिमंडल१ च्या अखत्यारित सहा पोलीस ठाणी असतील (कुलाबा, कफ परेड, आझाद मैदान, एमआरए मार्ग, एलटी मार्ग, मरिन ड्राईव्ह). जे. जे. मार्ग पोलीस ठाणे हे बंदर क्षेत्राअंतर्गत येईल. यलो गेट सागरी, वडाळा, शिवडी आणि डोंगरी पोलीस ठाण्यांसोबत सागरी क्षेत्राची टेहळणी करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. परिमंडल दोनअंतर्गत पायधुणी, व्ही. पी. रोड, मलबार हिल, गावदेवी आणि ताडदेव पोलीस ठाणे तर आग्रीपाडा, काळाचौकी, वरळी, एन. एम. जोशी मार्ग, भायखळा यासह नागपाडा पोलीस ठाणे परिमंडल ४च्या कार्यक्षेत्रात येणार आहे. केंद्रीय परिमंडल चारऐवजी ५ म्हटले जाईल आणि या कार्यक्षेत्रात भोईवाडा, आर.ए.के. मार्ग, माटुंगा, अँण्टॉप हिल, सायन आणि वडाळा टी. टी. ही पोलीस ठाणी येतील.

Post Bottom Ad