प्लॅटफॉर्मच्या उंचीबाबत परेची नकारघंटा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2014

प्लॅटफॉर्मच्या उंचीबाबत परेची नकारघंटा

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे होणार्‍या अपघातांमुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, कंत्राटदार नाही, जागा, वेळ नाही तसेच रेल्वे बोर्डाची मंजुरीदेखील नाही, असे पश्‍चिम रेल्वेचे सांगणे आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेमार्गावरील सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी ३१ मे २0१६ पर्यंतचा कालावधी लागेल, असे पश्‍चिम रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकल यामधील गॅप कमी होण्यासाठी आणखी किमान २ वर्षांची वाट पहावी लागणार आहे. 

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची ९२ सेंटीमीटर करण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावरील ३२ प्लॅटफॉर्मची उंची ७६ सेंटीमीटर आहे तर १६ प्लॅटफॅार्मची उंची ७६ ते ८४ सेंटीमीटरपर्यंत आहे. हे प्लॅटफॉर्म उंच करण्याचे काम ३१ मार्च किंवा ३१ मे २0१५ पर्यत पूर्ण होईल; परंतु ९७ प्लॅटफॉर्म ज्यांची उंची ८४ सेंटीमीटर आहेत त्यांची उंची वाढविण्यासाठी ३१ मे २0१६ पर्यंत वेळ लागेल, असे पश्‍चिम रेल्वेचे म्हणणे आहे. मुळातच हे काम मे २0१५ पर्यंत हाती घेताच येणार नाही कारण या कामाची कंत्राटे ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत दिली जाणार असल्याचेही रेल्वेने म्हटले आहे. 

परेवरील ९७ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता; परंतु २0१४-१५ च्या कामकाजात त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे १६ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम विभागीय रेल्वेच्या निधीतून करण्यात येत असल्याचे परेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी वाहतूक बंद असावी लागते. उपनगरीय रेल्वेची वाहतूक रात्रीचे २ ते ३ तासच बंद असल्यामुळे कामासाठी तेवढाच कालावधी मिळत असल्याचेही त्या अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad