मुंबई ( जेपीएन न्यूज ) : उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतच आहे. या वाढत्या प्रवाशांच्या गर्दीला तिकीट देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑटोमॅटिक तिकीट वेंडिग मशिन्स (एटीव्हीएम) सर्व रेल्वे स्थानकांवर लावलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी स्वत: स्मार्टकार्डच्या आधारे तिकीट काढू शकतात. परिणामी तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी कमी होत आहे. मध्य रेल्वे मार्गावर आजच्या घडीला नवीन ११२ एटीव्हीएम मशिन्स लावण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर नवीन ११२ एटीव्हीएम मशिन्स लावण्यात येणार होत्या. ही एटीव्हीएम मशिन्स लावण्याचे काम पूर्ण झाले असून या मशिन्सच्या आधारे तिकीट देण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. सोमवारी ७ नवीन एटीव्हीएम मशिन्स भायखळा आणि सॅण्डहस्र्ट रोड स्थानकात लावण्यात आल्या. परिणामी ११२ नवीन एटीव्हीएम मशिन्स मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणार्या प्रवाशांना गर्दीच्या वेळेस तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवर रांगा लावण्याची आवश्यकता राहणार नाही.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकात १५, मुलुंड स्थानकात ६, भांडुप स्थानकात ४, नाहूर स्थानकात २, विक्रोळी स्थानकात ६, घाटकोपर स्थानकात ७, विद्याविहार स्थानकात ५, कुर्ला स्थानकात ८, दादर स्थानकात ९, सायन स्थानकात ७, पनवेल स्थानकात ७, खांडेश्वर स्थानकात ४, मानसरोवर स्थानकात ३, खारघर स्थानकात २, सीवूड दारावे स्थानकात २, नेरूळ स्थानकात ४, बेलापूर स्थानकात ३, मस्जिद स्थानकात ५, भायखळा स्थानकात ५, सॅण्डहस्र्ट रोड स्थानकात ३ नवीन एटीव्हीएम मशिन्स लावण्यात आल्या आहेत.