आता एसीबीचेही मोबाइल अँप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2014

आता एसीबीचेही मोबाइल अँप

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले असून एसीबी लवकरच आपले मोबाइल अँप सादर करणार आहे. भ्रष्टाचाराला बळी पडलेल्या पीडितांना या मोबाइल अँपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर व्हिडीओ, ऑडिओ आणि डिजिटल फायली सादर करता येणार आहेत. हे मोबाइल अँप लवकरच सादर करण्यात येणार आहे. हे काम प्रगतिपथावर आहे, असे एसीबीचे संचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

समाजात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी एसीबी सक्रिय झाले असून चालू वर्षात एसीबीने १,६६१ भ्रष्ट सरकारी बाबूंना अटक केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ११७ टक्क्यांनी अधिक आहे. एसीबीकडे भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी अधिकाधिक सामान्य लोकांनी पुढे यावे आणि त्यांना एसीबीकडे सहजरीत्या पाचारण करता यावे यासाठी हे मोबाइल अँप तयार करण्यात आले आहे. विशेषत: टेकनोसॅव्ही लोकांसाठी ही संकल्पना आखण्यात आली असल्याचे एसीबीने सांगितले. त्यामुळे पीडित आणि एसीबीमधील रुंदावलेली दरी कमी होईल, असा विश्‍वासही एसीबीने व्यक्त केला आहे. 

भ्रष्टाचार्‍यांना सार्वजनिकरीत्या प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या समाजमाध्यमावर अटक करण्यात आलेल्या भ्रष्ट व्यक्तीचे छायाचित्र आणि संबंधित प्रकरणाची माहिती नमूद करण्याची अभिनव कल्पना एसीबीने वास्तवात उतरवली आहे. देशात प्रथमच अशा प्रकारे भ्रष्टाचार्‍यांना सर्वांसमोर उघडे पाडण्याची क्लुप्ती राज्याच्या लाचलुचपत विभागाने अमलात आणली. २0१३ मध्ये रचण्यात आलेल्या ५७४ सापळ्यांमध्ये ७६४ भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या मध्यस्थांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या व्यक्तीकडे लाच मागण्यात आली आहे, तिला ती रक्कम उपलब्ध करून देण्यास आमचा प्राधान्यक्रम असेल. लाचखोरांना सापळ्यात अडकवण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम सरकारकडून उपलब्ध करून देता येईल, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे दीक्षित यांनी सांगितले. 

Post Bottom Ad