नागपूर ( जेपीएन न्यूज ): मुंबईतील झुणका भाकर केंद्राच्या प्रश्नी आपण तत्काळ लक्ष घालू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज औचित्याच्या मुद्द्यद्वारे लक्ष वेधले.
युती शासनाच्या काळात मुंबईत झुणका भाकर केंद्र योजना सुरु करण्यात आलेली होती. या योजने अंतर्गत संपूर्ण मुंबई शहरातील विविध संस्थाना शासनाच्या जागांवर झुणका भाकर केंद्रे उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतर आघाडी सरकारच्या काळात या योजनेचे नाव बदलून अन्नदाता आहार योजना असे करण्यात आले. मात्र काही झुणका भाकर केंद्रांचा समावेश या योजनेत केला गेला नाही. त्यामुळे मुंबईतील बहुतांश झुणका भाकर केंद्रांना मनपा तर्फे दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी किंवा ही झुणका भाकर केंद्रे अनधिकृत असून ते निष्कासित करण्याची कलम ३१४ नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसासाठी सुरु केलेली ही योजना अडचणीत आली आहे. याकडे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज औचित्याच्या मुद्द्यद्वारे लक्ष सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ लक्ष देऊ अशी ग्वाही दिली.