मुंबई ( जेपीएन न्यूज ): वरळी येथील उच्चभ्रू परिसरातील 'सुखदा' आणि 'शुभदा' या इमारतींमधील काही माजी मंत्र्यांनी आणि काही राजकीय नेत्यांनी आलिशान फ्लॅटच्या जागेत केलेले अनधिकृत वाढीव बांधकाम पाडून टाकावे किंवा पालिकेकडून नियमित करून घ्यावे, अशी नोटीस बजावूनही त्याची अंमलबजावणी न केलेल्या १२ बड्या धेंडांच्या कामांची पाहणी महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी येत्या गुरुवारी करणार आहेत. या वेळी विरोध होण्याची शक्यता गृहित धरून कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. ही अवैध बांधकामे त्याच दिवशी पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यास या नेत्यांना दणका बसणार आहे.
'सुखदा' आणि 'शुभदा'मध्ये काही माजी मंत्र्यांनी आपापल्या फ्लॅटमध्ये बेकायदा कार्यालय आणि जिम सुरू केले होते. ते निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाने संबंधितांना दोन वर्षांपासून नोटिसा बजावल्या होत्या. ही बांधकामे स्वत:हून पाडा किंवा पालिकेकडून नियमित करा, असे नोटीसमध्ये नमूद केले असताना काहींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला; पण या एक डझन मंडळींनी काहीच हालचाल केली नाही किंवा उत्तरही दिलेले नाही. यामुळे या १२ जणांच्या आलिशान सदनिकांमध्ये पालिकेचे अधिकारी जाऊन पाहणी करणार आहेत. १२ पैकी किती जणांनी पालिकेच्या नोटीशीला कसा प्रतिसाद दिला आहे, याची तपासणी करण्यात येईल. ज्यांनी नोटीसप्रमाणे पूर्तता केली आहे, त्यांच्यावर काही कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पण ज्यांनी काहीच सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, असे त्या वेळी आढळेल त्यांच्यावर त्याच दिवशी किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या वेळी विरोध होण्याची शक्यता गृहित धरून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती विभाग अधिकारी केशव उबाळे यांनी दिली.