नवी दिल्ली / मुंबई ( जेपीएन न्यूज ) : सॉफ्टवेअर क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या माइक्रोसॉफ्ट कंपनीने ‘‘विंडोज टू इन वन‘‘ हे इलेक्ट्रॉनिक उपकरण सादर केले आहे. या उपकरणाचा संगणक आणि टॅबलेट अश्या दोन्ही प्रकारे वापर करता येणार आहे.
‘‘विंडोज टू इन वन‘‘ हे इलेक्ट्रॉनिक उपकरण टॅबलेट सारखे दिसते. परंतू त्याच्या वापर पूर्णपणे संगणकसारखा करता येऊ शकतो. शिवाय, संगणकात असलेल्या सर्व सोई-सुविधा यात उपलब्ध असणार आहेत. याची किंमत 9990 रुपये ठेवण्यात आल्याचे माइक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विंडोज व्यवसाय संचालक विनीत दुरानी यांनी सांगितले.
‘‘विंडोज टू इन वन‘‘मध्ये विंडोज 8.1 कार्य प्रणाली देण्यात आली असून, विंडोज ऑफिसचे एक वर्षासाठी सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. याच्या व्यतिरीक्त, ‘वन ड्राइव्ह‘वर अमर्यादित स्टोरेज सुविधा पुरवली जाणार आहे. ‘‘विंडोज टू इन वन‘‘ हे इलेक्ट्रॉनिक उपकरण एचडीएमआय केबलद्वारे टी.व्ही सोबत आणि डोंगलच्या माध्यमातून हेडफोन्स, प्रिंटर, माउससोबत जोडता येणार आहे. एचपी, लेनोवो, डेल, आसुस, तोशिबा, एस्सार, आईबॉल, जोलो आणि नोंशन इंक या कंपन्यादेखील ‘‘विंडोज टू इन वन‘‘चे निर्माण आणि विक्री करू शकणार आहेत.