महापालिकेने याठिकाणी चांगले उद्यान निर्माण केल्याबद्दल महापालिका व बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर तसेच त्यांच्या टीमचे अभिनंदन करत असल्याचे रावते म्हणाले. या उद्यानात येण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची वेळ निश्चित करून उद्यानाचे योग्य प्रकारे परिरक्षण करण्याची सूचना या वेळी रावते यांनी केली. त्याचप्रमाणे आरक्षित असलेल्या भूखंडाचा विकास होईपर्यंत अशा भूखंडाचा मुलांना मैदान म्हणून वापर करू देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. यामुळे मुलांना अधिकाअधिक खेळाचे मैदाने उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उद्यानाचा अधिक विकास करण्यासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये देत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
महापौर स्नेहल आंबेकर बोलताना म्हणाल्या की, मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने महापालिकेतर्फे अधिकाधिक उद्याने उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार महर्षी वसंतदादा पाटील उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी पदपथ तसेच तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त उद्यानाच्या माध्यमातून मुंबईला प्रदूषणविरहित करण्याचा आमचा संकल्प असल्याचे महापौरांनी शेवटी सांगितले.