मुंबईच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र कार्यरत असणाऱया बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबविले जात असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गिरगांव चौपाटीच्या स्वच्छतेसाठी आता अत्याधुनिक `बीच क्लिनिंग मशीन`ची व्यवस्था कंत्राटदाराच्या सहकार्याने करण्यात आली आहे.या अत्याधुनिक मशीनमुळे गिरगांव चौपाटीवरील सव्वा लाख चौरस मीटर परिसराची स्वच्छता अवघ्या चार तासांत पूर्ण करणे शक्य झाले असून या मशीनच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे चौपाटीवरील वाळू भूसभूशीत व मऊशार राहण्यास मदत होत आहे.
२५ ऑक्टोबर, २०१४ पासून गिरगांव चौपाटीवर अत्याधुनिक `बीच क्लिनिंग मशीन`चा नियमित स्वरुपात यशस्वीपणे वापर करण्यात येत आहे. या मशीनबाबत सविस्तर माहिती देताना घन कचरा व्यवस्थापन खात्याचे सहाय्यक अभियंता श्री. गुरव यांनी सांगितले की, हे मशीन एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने चौपाटीवरील सव्वा लाख चौरस मीटर परिसरात नियमित स्वरुपात वापरले जात आहे. या मशीनच्या खाली असणारी ६ इंच लांबीची वैशिष्ट्यपूर्ण पाती ही वाळुच्या आतमध्ये ६ इंच जावून वाळुच्या वरील व आतील बारीक-सारीक कचरासुद्धा बाहेर काढतात. यानंतर मशीनमध्येच असणाऱया विशिष्टप्रकारच्या जाळीवरुन तो कचरा फिरविला जातो, ज्यामुळे कचरा व वाळू वेगळे होऊन कचरा मशिनच्या मागे असणाऱया कंटेनरमध्ये साठविला जातो. तर वाळू पुन्हा चौपाटीवर टाकली जाते.या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिगरेटच्या थोटकांसारखा सहजपणे डोळ्याला न दिसणारा व वाळुमध्ये रुतलेला कचरादेखील बाहेर काढला जातो. तसेच ६ इंचापर्यंतची वाळू सातत्यामुळे वरखाली होत असल्यामुळे चौपाटीवरील वाळुचा थर मऊशार व भूसभूशीत राहण्यासही मदत होते, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक अभियंता गुरव यांनी दिली.
गुरव यांनी या सर्व प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, गिरगांव चौपाटीवर यापूर्वी देखील अशाप्रकारचे मशीन वापरण्यात येत होते. मात्र, त्याची गती नव्याने जर्मनीहून आयात केलेल्या अत्याधुनिक मशीनपेक्षा अत्यंत कमी होती. तसेच नव्या मशिनची ओल्या वाळुमध्ये कार्य करण्याची क्षमतादेखील लक्षणीय आहे, ज्यामुळे कमी वेळांत अधिक चांगल्याप्रकारे चौपाटीची सुयोग्य स्वच्छता करणे शक्य होत आहे.
मुंबईकरांच्या सेवेमध्ये नव्याने रुजू झालेले `बीच क्लिनिंग मशीन` आठवड्याचे सातही दिवस व २४ तास कार्यरत ठेवण्यात येत असून केवळ संध्याकाळी गर्दीच्यावेळी या मशिनचा मर्यादित वापर केला जातो. मुंबईकरांचा अभिमान असणारी गिरगांव चौपाटी स्वच्छ व सुंदर रहावी, याकरीता महापालिकेतर्फे तीन पाळ्यांमध्ये सातत्यपूर्ण साफसफाई केली जाते. यासाठी कामाची पहिली पाळी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर दुसरी पाळी दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत असते. या दरम्यान `बीच क्लिनिंग मशीन`सह १२ कामगार कार्यरत असतात. दररोज संध्याकाळी चौपाटीवर मोठी वर्दळ असते व याच दरम्यान कचऱयाचे निर्माण होण्याचे प्रमाणदेखील सर्वाधिक असते, ही बाब लक्षात घेऊन रात्री ११ ते सकाळी ७ या दरम्यान सर्वांधिक क्षमतेने चौपाटीच्या स्वच्छतेचे काम संपूर्ण रात्रभर अखंडपणे चालू असते. या कालावधीत `बीच क्लिनिंग मशीन`सह आवश्यकतेनुसार अधिकाधिक कामगार कर्तव्यार्थ तैनात असतात.
गिरगांव चौपाटीवर साधारणपणे दर २४ तासामध्ये ६ हजार किलो कचरा मशिनद्वारे व माणसांद्वारे गोळा केला जातो व आवश्यकतेनुसार विलगीकरणानंतर सदर कचरा कॉम्पॅक्टरद्वारे क्षेपणभूमीवर पाठविला जातो. चौपाटीवर येणाऱया लोकांद्वारे निर्माण होणाऱया कचऱयाबरोबरच समुद्राच्या लाटांद्वारेदेखील काही प्रमाणात कचरा वाहून येत असतो. या सर्व कचऱयाचे सुयोग्य व्यवस्थापन महापालिकेद्वारे दिवसरात्र केले जात असते.