महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि प्रचंड निर्णयक्षमता असलेला 'धडाकेबाज' नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या अंतुले यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. काही दिवसांपूर्वी ते पूर्णपणे बेशुद्धावस्थेत गेले होते. अखेर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अंतुले यांचे पार्थिव आज मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील आंबेत या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यातील आंबेत गावी झाला. मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली. पुढे ही पदवीच त्यांची ओळख बनली. १९६२ साली ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून १९७६ पर्यँत ते विधानसभेवर होते. त्या दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्रिपदे सांभाळली. १९७६ ते १९८० या काळात ते राज्यसभेवर होते.