मोदींची मर्जी राखण्यासाठीच राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

मोदींची मर्जी राखण्यासाठीच राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळण्यासाठीच राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आता शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी केली. गांधीभवन संपर्क कार्यालयात ते बोलत होते.


छोट्या पक्षांना मोडीत काढण्याची भाजपाची भूमिका आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देणे म्हणजे रा. स्व. संघाचे हात बळकट करण्यासारखे आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचाच हक्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यात अर्थ नाही. सरकारची बाजू सांभाळणारे आता विरोधी पक्ष बनू पाहत आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली. शिवसेनेचे मंत्री आता ताठ मानेने शपथ घेऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे राज्य सरकारचा प्रवास अस्थिरतेकडून अधिक अस्थिरतेकडे सुरू झाला आहे. सेनेला हे सरकार फार काळ चालवणे परवडणार नाही, असेही ते म्हणाले. वारंवार स्वाभिमानाचा आव आणणारी शिवसेना अखेरीस सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीसमोर झुकली असून शिवसेनेचा वाघ आता तुकड्यांवर जगताना दिसेल, अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात धारेवर धरू. मराठवाड्यात एक आठवड्यात २१ व एका महिन्यात १३0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्याचे सरकार हे शेतकर्‍यांचे नाही तर व्यापार्‍यांचे हित सांभाळणारे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Post Bottom Ad