'थर्टी फस्र्ट' च्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2014

'थर्टी फस्र्ट' च्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील चौपाट्या, प्रसिद्ध ठिकाणे, इमारतींच्या गच्ची, हॉटेल या सर्वच ठिकाणी लोकांची झुंबड उडते. नववर्षाचा हा आनंद कौटुंबिकरीत्या साजरा करता यावा यासाठी गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू किनारा आणि मढ आयलंड अशा प्रसिद्ध ठिकाणांचा काही भाग केवळ कुटुंबासाठी आरक्षित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी कुटुंब आणि तरुणांच्या गटासाठी वेगळा परिसर राखून ठेवण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास पुढील वर्षापासून शहरभर ती राबवण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी बोटींवरील पाटर्य़ांना बंदी घालण्यात आली आहे. 

२६/११ सारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी किनारपट्टी आणि समुद्रात टेहळणीसाठी तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग आणि नौदलासह संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती, असे कुलकर्णी यांनी पुढे सांगितले. पोलिसांच्या या निर्णयाचे लोकांकडून स्वागत होत आहे. या वेळी दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहराच्या सुरक्षेत विशेषत: किनारपट्टी भागांत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी मेटल डिटेक्टरसह पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच जंक्शनवर विशेष चौक्या उभारण्यात येणार असून या ठिकाणी अद्ययावत शस्त्रास्त्रांसह पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. 

गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी बोटींवर पार्टी करण्यास बंदी. यासाठी पोलिसांनी नुकताच कोस्टल हेल्पलाईन क्रमांक (१0९३) जारी केला आहे.

शहरातील १२0 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर मुख्य नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जाणार आहे, तर १00 अतिरिक्त कॅमेर्‍यांवर प्रादेशिक नियंत्रण कक्षातून देखरेख केली जाणार आहे.

विनयभंग आणि लैंगिक अत्याचारांचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांमार्फत शहरात ९३ छेडछाड विरोधी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad