मुंबई / प्रतिनिधी - मुंबई मध्ये काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यामधील काही पुतळे मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतील आहेत. पालिकेच्या अखत्यारीतील या महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छताच राखली जातनाही यामुळे महापुरुषांचा अवमान होत असल्याने पालिकेने महापुरुषांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता राखावी अशी मागणी महापौर, पालिका आयुक्त, पालिका उप आयुक्त परिमंडळ ५, सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
मुंबई चेंबूर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांचा तर पांजरपोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यांची वर्षातून काही विशिष्ट दिवशी स्वच्छता राखण्यात येते. तेही मुंबईच्या महापौर पुष्पहार घालण्यासाठी येणार असतात म्हणून. इतर दिवशी या पुतळ्यांवर धूळ आणि पक्षांची विष्टा पडून हे पुतळे विद्रूप होत असल्याने या महापुरुषांचा अवमान होत असतो. या कारणाने महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता राखावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे शाखा अध्यक्ष राजेंद्र नगराळे यांनी केली आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता रक्न्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नगराळे यांनी निवेदनात दिला आहे.