मुंबई महानगर पालिकेच्या ११५८ शाळांमध्ये साढे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणारी हि मुले विशेष करून मागासवर्गीय, मुस्लिम आणि घरातील आर्थिक परिस्तिथी बिकट असलेली आहेत. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्तिथी बिकट असल्याने नाईलाजाने त्यांना पालिकेच्या शाळांमधून शिक्षण घ्यावे लागत आहे.
पालिका शाळांमधील शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पालिका शाळांमधून सायंकाळी ६. ३० ती रात्री १० पर्यंत अभ्यास करण्यासाठी एकलव्य अभ्यासिका सुरु करण्यात आली. या अभ्यासिकेत पालिकेचे व नंतर इतर विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अश्या अभ्यासिका पालिका शाळांमधून २६, २७ नोव्हेंबर २०१४ पासून सुरु करण्यात आल्या.
अशीच एक अभ्यासिका घाटकोपर येथील माता रमाई आंबेडकर नगर मधील पालिकेच्या शाळा नंबर १ मध्ये सुरु करण्यात आली. या अभ्यासिकेत रमाई आंबेडकर नगर येथील पालिका शाळेतील व इतर विद्यार्थी येत होते. या अभ्यासिकेसाठी एखादी वर्ग खोली देणे गरजेचे होते. परंतू पालिकेच्या शिक्षण विभागाच्या बिनडोक शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी अभ्यासिकेसाठी जुनी केमिकल ने भरलेली व बंद अवस्थेत असलेली प्रयोगशाळा कोणताही विचार न करता वापरासाठी दिली होती.
विद्यार्थी आणि लहान मुले म्हटली कि मस्ती हि आलीच आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमी कोणत्याही नवीन गोष्टीचे कुतूहल हे असतेच. अभ्यासिकाच बंद पडलेल्या प्रयोगशाळेमध्ये असल्याने एका विद्यार्थ्यांने जळत्या दिव्यावर प्रयोगशाळेमध्ये असलेले केमिकल ओतले आणि प्रयोगशाळेमध्ये सर्वत्र आग पसरली. यामध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारे प्रथमेश खिल्लारे, संदीप जाधव, विशाल सूर्यवंशी, प्रफुल्ल भोजने व रोशन मलिक हे ५ विद्यार्थी १५ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास गंभीर जखमी झाले आहेत. रोशन मलिक वर खाजगी तर इतर विद्यार्थ्यांवर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाने या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत लपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणालाही सांगू नका आपण काय ते इथल्या इथे बघून घेवू असे शाळा प्रशासनाकडून स्थानिकांना सांगण्यात येत होते. पालिकेचा शिक्षण विभाग हे प्रकरण दाबून टाकत आहे असे चित्र दिसल्यावर येथील रहिवाश्यांच्या संतापाचा बांध फुटला आणि पत्रकार, नगरसेवक, लोकप्रतिनिधीना या प्रकाराची माहिती देण्यात आली.
रमाई आंबेडकर नगर मधील स्थानिक मनसेचे नगरसेवक सुरेश आवळे हे कधीतरी पालिका सभागृहात येत असल्याने काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. दुर्घटनेला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या औषध उपचाराचा खर्च पालिकेने करावा अश्या मागण्या छेडा यांनी यावेळी केल्या. महापौरांनीही चौकशीचे आदेश देवून अहवाल येई पर्यंत हरकतीचा मुद्दा राखुन ठेवला आहे.
घडल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असताना शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी मात्र शिक्षण विभागाला पाठीशी घालत या विद्यार्थांचीच चूक असल्याचे म्हटले आहे. शेलार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हि अभ्यासिका सुरु करण्याची योजना विनोद शेलार यांनीच सुरु केली आहे. कोणतीही नवीन योजना राबवताना त्यांचा बरा वाईट दोन्ही बाजूने विचार करावा लागतो. तसा विचार शेलार यांनी बहुतेक केला नसावा म्हणून हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडी मध्ये आळ्या सापडणे, विधानसभेत उपस्थित झालेला १०५ शाळांमध्ये मुख्याध्यापक नसण्याचा प्रश्न, रमाई आंबेडकर नगरातील शाळे मधील विद्यार्थी आगी मध्ये भाजल्याचा प्रकार असो किंवा इतर कोणतेही प्रकार असो अश्या कोणत्याही प्रकारची माहिती पालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून शेलार यांच्याकडे नसते. अशी माहिती पत्रकारांकडून मिळाल्यावर ते आपली यंत्रणा कामाला लावतात आणि प्रकार कसा आणि काय घडला याची माहिती पत्रकारांना देतात.
विनोद शेलार यांच्या अश्या कार्यपद्धतीमुळे येणाऱ्या काळात शाळांमधून एखादी अनुचीत घटना घडू शकते, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा जीव जाऊ शकतो याची वेळीच नोंद घेण्याची गरज आहे. शेलार यांची आपल्या शिक्षण विभागावर पकड असायला हवी. शिक्षण विभागात काय होते याची सर्व माहिती शेलार यांना अध्यक्ष म्हणून असायला हवी. परंतू तसे होत नसल्याने शेलार यांची यंत्रणा सर्व प्रकार घडून गेल्या नंतर कामाला लागते आहे.
शेलार यांनी पालिका शाळांमधून अभ्यासिका सुरु केली परंतू त्यासाठी वर्गखोल्या उपलब्ध केल्या का, विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षक, सुपरवायजर नेमेले होते का, घाटकोपर रमाई आंबेडकर नगरात बंद पडलेल्या प्रयोगशाळेमध्ये जुन्या केमिकल असलेल्या जागेमध्ये २० दिवस अभ्यासिका सुरु होती इथे एखादा अपघात होऊ शकतो हे शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाला माहित नव्हते का ? शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाने प्रयोगशाळे ऐवजी चांगल्या वर्गखोली मध्ये अभ्यासिका सुरु केली असती तर हा अपघात झाला असता का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून शेलार यांनाच द्यावी लागणार आहेत.
दरम्यान याबाबत स्थानिक पंतनगर पोलिस ठाण्यामध्ये शिक्षण विभागाने हलगर्जी पणा केल्याचा, लहान विद्यार्थ्यांची काळजी न घेतल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लवकरच पोलिस हलगर्जीपणा करणार्यांवर कारवाई करतील. पण पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष आणि शिक्षण विभागाचे काय ? पालिकेच्या शाळांमधून लहान विद्यार्थ्यांचा जीव जाण्याआधी किंवा अनुचित प्रकार होऊच नये म्हणून विनोद शेलार व शिक्षण अधिकारी आपली यंत्रणा कामाला लावणार आहेत का ?
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment