मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेने परेल येथील ९२ म्युन्सिपल चाळ धोकादायक ठरवली असली तरी पालिकेने येथील ७७ रहिवाश्यांचे पुनर्वसन केलेले नाही. या रहिवाश्यांचे पुनर्वसन ७ दिवसात न केल्यास पुन्हा धोकादायक इमारती मध्ये राहायला जाऊ असा इशारा बामणदेव सहकारी गृहनिर्माण संस्थेचे रामचंद्र दुदम,चंद्रशेखर दुधवडकर व दिलीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
परेलच्या बोगदा चाळ येथील २१६ पैकी १०० रहिवाश्यांचे पालिकेने स्वतः पुनर्वसन केले आहे. इतर काही रहिवाश्यांचे पालिकेने पिपिएच्या मध्ये पुनर्वसन केले असून ७७ रहिवाश्यांचे अद्याप पुनर्वसन केलेलं नाही. याबाबत सोसायटी ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता पालिकेने रहिवाश्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले आहेत. पालिकेने या रहिवाश्यांचे पुनर्वसन अद्याप केलेले नाही असे रामचंद्र दुदम यांनी सांगितले.
सोसायटीच्या विकासकाने पुनर्वसन केले नसल्याने एलवाय रद्द करण्याची कारवाई ऑगस्ट २०१४ मध्ये पूर्ण झाली तरी तसे आदेश काढण्यास पालिकेने टाळाटाळ चालवली आहे. यामुळे रहिवाश्यांचे अद्याप पुनर्वसन होऊ शकलेले नाही. पुनर्वसन झाले नाही तर पुन्हा धोकादायक इमारतीमध्ये राहायला जाऊ आणि त्यानंतर काही दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी पालिकेची असेल असा इशारा येथील रहिवाश्यांनी दिला आहे.