मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमधील घुसखोरी, गैरप्रकार, मुलांचे लैंगिक शोषण यांना आळा घालता यावा यासाठी पालिकेच्या शाळांमधून सीसीटीव्ही क्यामेरे लावण्याची मागणी नगरसेवक दीपक पवार यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.
मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६१ (क्यू) अन्वये प्राथमिक शिक्षण देण्याचे कर्तव्य चोख बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणासाठी शाळा चालविणे, त्यांना सहाय्य करणे, शाळांसाठी जागेची व्यवस्था करणे हे पालिकेचे आवश्यक कर्तव्य आहे. मात्र काही पालिकेच्या शाळांमधून समाजकंटकांकडून घुसखोरी केली जाते, शिक्षक मोबाईल वर सतत बोलत असतात, मुला मुलींचे लैंगिक शोषण होते. अश्या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक आहे. शाळांचे प्रवेशद्वार, मोकळी जागा, व मोक्याच्या जागी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आल्यास अश्या प्रकारांना आळा घालणे शक्य होऊ शकते. म्हणून शाळांच्या आवारात सीसीटीव्ही क्यामेरे लावावेत अशी मागणी दीपक पवार यांनी केली आहे.