पृथ्वीच्या परिघाच्या तिपटीने धावतेय मुंबईची लोकल ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

पृथ्वीच्या परिघाच्या तिपटीने धावतेय मुंबईची लोकल !

मुंबई : 'मुंबईकरांची जीवनवाहिनी' अर्थात उपनगरीय लोकलबद्दलच्या विविध विस्मयकारक बाबी पश्‍चिम आणि मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी उजेडात आणल्या आहेत. यापैकी एक म्हणजे, पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर धावणार्‍या लोकल दरदिवशी जे अंतर कापतात, ते अंतर पृथ्वीच्या परिघाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. या धक्कादायक वस्तुस्थितीमुळे उपनगरीय लोकल यंत्रणेवरील अतिताणाचाही उलगडा झाला आहे. 

पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात रेल्वे बोर्ड सदस्यांच्या बैठकीत उपनगरीय लोकल व्यवस्थेबाबत अहवाल सादर केला. त्या अहवालाद्वारे लोकल दरदिवशी किती अंतर कापते? यासह अन्य काही विस्मयकारक बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. मध्य रेल्वेच्या १२१ लोकल दरदिवशी ६९,५१६ किमी इतके अंतर कापतात, तर पश्‍चिम रेल्वेच्या ८४ लोकल ४४,५६८ किमी अंतर धावतात. दोन्ही मार्गांवर धावणार्‍या लोकलचा विचार करता एकूण १ लाख १४ हजार ८४ किमी अंतर कापले जाते. हे प्रमाण पृथ्वीच्या परिघाच्या तुलनेत तिप्पटीने अधिक आहे. पृथ्वीचा परिघ ४0,0७५ किमी इतका आहे. 

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर ७५ लोकल ४५,२२0 किमी अंतर कापतात. आम्ही दरदिवशी र्मयादित लोकल गाड्यांच्या सहाय्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर सेवा देतो, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मागील काही महिने मध्य रेल्वेची सेवा वारंवार विस्कळीत होऊ लागली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होतात खरे; पण लोकल सेवेवर असलेला अतिताण दुर्लक्षिला जात असल्याचे म्हणणे संबंधित अधिकार्‍याने मांडले. मध्य रेल्वेकडे जुन्या लोकल गाड्या आहेत, याकडेही रेल्वे अधिकार्‍यांनी बोर्ड सदस्यांचे लक्ष वेधले आहे. मध्य रेल्वेकडे जवळपास ३0 डीसी लोकल गाड्या आहेत, ज्या मेन लाइन(सीएसटी-कर्जत/कसारा/खोपोली) आणि हार्बर लाइन(सीएसटी/पनवेल/अंधेरी आणि ठाणे-वाशी व तुर्भे-नेरूळ) या मार्गांवर चालवल्या जातात. 

दुसरीकडे, पश्‍चिम रेल्वे संपूर्णत: २५ हजार व्होल्ट एसी विद्युत पुरवठय़ावर लोकल चालवते. असे असतानाही पश्‍चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वे कमी वेळेत लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करते. मध्य रेल्वेवर सीएसटी-कसारा हा १२१ किमीचा लोकल प्रवास पूर्ण करण्यासाठी २ तास १0 मिनिटे लागतात, तर पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू हा १२४ किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी २ तास ४८ मिनिटे इतका वेळ लागतो.
मध्य रेल्वे
मेन लाइन : ४५,२२0 ट्रेन किमी.
हार्बर व ट्रान्स हार्बर लाइन्स : २४,२९६ ट्रेन किमी.
पश्‍चिम रेल्वे
मेन लाइन : ४४,४२९ ट्रेन किमी.
हार्बर लाइन : १३९ ट्रेन किमी.

Post Bottom Ad