बेलार्ड इस्टेट ते वडाळा स्वतंत्र मार्गिकेचा प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2014

बेलार्ड इस्टेट ते वडाळा स्वतंत्र मार्गिकेचा प्रस्ताव

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : 
हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. पनवेल-वाशीहून सीएसटीला नोकरीनिमित्त येणार्‍या हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एक विशेष योजना आखण्यात आली आहे. हार्बर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेला ताण लक्षात घेऊन हा ताण कमी करण्यासाठी या मार्गावर बेलार्ड इस्टेट येथून बीपीटीच्या जागेतून वडाळय़ापर्यंत नवीन मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) हा प्रस्ताव मांडण्यात आला असून तो मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून हार्बर मार्गावर खारघर, मानसरोवर, खांदेश्‍वर आणि पनवेल या स्थानकांच्या आसपासच्या लोकवस्तीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी हार्बर मार्गावर प्रवासी वाहतुकीचा ताण वाढू लागला आहे. मात्र त्या तुलनेत या मार्गावरील उपनगरीय वाहतूक सेवा तितकीशी सक्षम नाही. त्यातच या मार्गावरील प्रवाशांना सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांवर मध्य रेल्वेकडे सध्या तरी काहीच उपाययोजना नाही. सध्या हार्बर मार्गावरील सर्वच लोकल गाड्या १२ डब्यांच्या करून या मार्गावरील प्रवास वाहन क्षमता ३३ टक्क्यांनी वाढविण्याचे काम सुरू आहे, परंतु त्यासाठी पुढील किमान २ वर्षे तरी लागणार आहेत.

रेल्वेने आखलेल्या या प्रस्तावानुसार सध्या पनवेल किंवा वाशीहून मुंबईकडे येणार्‍या लोकल गाड्या सीएसटीकडेच येणार आहेत. तर अंधेरी व वांद्रे आणि भविष्यात गोरेगाव येथे जाणार्‍या लोकल गाड्यांसाठी नवीन मार्गिका बांधण्यात येणार आहे. ही मार्गिका बेलार्ड इस्टेट येथून सुरू होणार आहे. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून जाणारी ही मार्गिका वडाळा स्थानकाला जोडली जाणार आहे. तेथून नेहमीच्या मार्गाने अंधेरीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अंधेरीहून येणार्‍या लोकल गाड्या सीएसटीला न येता बेलार्ड इस्टेट येथेच जातील. परिणामी हार्बर मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवता येणार आहे. या प्रस्तावामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी क्षमतेत प्रतितास ६0 हजारांनी वाढ होईल, असे एमआरव्हीसीच्या एका अधिकार्‍याने सांगितले. तसेच अंधेरीसाठी एक वेगळी मार्गिका उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

Post Bottom Ad