लोकलमधील सीसीटीव्हीचा निर्णय लांबणीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2014

लोकलमधील सीसीटीव्हीचा निर्णय लांबणीवर

मुंबई : लोकलमधील महिलांवर होणार्‍या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मुद्दा मागील काही दिवस चर्चिला जात होता; पण महिला प्रवाशांकडून आता एकांताचा मुद्दा उपस्थित झाला असल्यामुळे डब्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता डब्यातील आसनांजवळच्या भागाऐवजी लोकलमधील मार्गिका आणि मोकळ्या जागेत हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन काम करत आहे.

लोकलमधील महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात महिला संस्थांकडून आलेल्या सूचनांनंतर निर्मितीच्या पातळीवरच उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांतील डब्यात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'महिलांची सुरक्षा हा आमचा प्राधान्यक्रम आहे; पण गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत महिला प्रवाशांकडून एकांताचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच समस्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे,' असे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या (आयसीएफ) उत्पादन विभागाने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची जागा निश्‍चित केली आहे. उपनगरीय गाडीत चार ठिकाणी आणि लांब पल्ल्याच्या गाडीत आठ ठिकाणी नियोजनबद्घरीत्या हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. डब्यात प्रवेश करण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर बहुतेक कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तर इतर कॅमेरे लांब पल्ल्याच्या गाडीतील मोकळ्या जागेत लावण्यात येतील. याबाबत आयसीएफ लवकरच रेल्वेला आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad