भासमान पदाच्या नावावर मागासवर्गीयांच्या पदे धोक्यात
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या विवध प्रवर्गातील २० हजार पेक्षा जास्त पदे रिक्त असताना हि पदे पालिकेला अद्याप भरती करता आलेली नाही. पालिकेला या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यास पालिकेला अपयश आले असताना पालिकेने आपल्या रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील अनुसूचित जाती व मागासवर्गीयांच्या रिक्त पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सामावून घेण्याचा घाट घातला आहे. यामुळे मागासवर्गीयांची रिक्त पदे धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपुढे सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात शरीरक्रियाशास्त्र विभागात ६ पैकी ३ पदे पदोनत्तिने भरावयाची आहेत. हि ३ पदे अनुसूचित जातीची आहेत. सहयोगी प्राध्यापकांची ९ पैकी ६ पदे रिक्त आहेत. त्यातील ३ पदे अनुसूचित जातीची आहेत. जीवनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकाचे एक पद रिक्त आहे. औषधनिर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापकांची ५ पदांपैकी ३ पदे पदोन्नतीने व २ पदे अनुसूचित जातीमधून भरावयाची आहे.
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सामाजिक आरोग्य व रोग प्रतिबंधक शास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील प्राध्यापक व औषध शास्त्र, बधिरीकरण शास्त्र अशी महाविद्यालयामधील अनेक अनुसूचित जाती व मागासवर्गीयांची कित्तेक पदे रिक्त आहेत. या पदावर अनुसूचित जातीमधील उमेदवार मिळत नसल्याचे कारण पुढे करून भासमान पदाचे नाव देवून खुल्या प्रवर्गातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना या पदावर नियुक्त केले जाणार आहे. मागासवर्गीयांच्या या पदांवर खुल्या प्रवर्गातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना सामावून घेतले जाणार असल्याने मागासवर्गीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे