मुंबई ( जेपीएन न्यूज ): डास मारण्यासाठी धूर फवारणीला मागणीपेक्षाही कमी डिझेलचा पुरवठा होत असल्याने त्याचा भडका शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठकीत उडाला. धूर फवारणीसाठी मागणीपेक्षा कमी डिझेल मिळत असल्याची कबुली कीटकनाशक विभागाने यावेळी समितीला दिली.
एकटय़ा भांडुप ‘एस’ विभागात १ ऑक्टोबर ते १८ डिसेंबर २०१४ या कालावधीत १३ नगरसेवकांसाठी २३ हजार ६०० लिटर डिझेलची मागणी केली होती. परंतु घाटकोपर व देवनार गॅरेजमधून केवळ १६ हजार लिटर डिझेलच धूर फवारणीसाठी दिले होते, अशी लेखी माहिती एस विभाग कार्यालयातील कीटकनाशक विभागातील अधिका-यांनी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मागणीपत्रानुसार नोंदी घेऊन त्या तुलनेत कमीच डिझेल दिले जाते.
डिझेल खरेदीची प्रक्रिया मोठी असल्याने त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे डिझेलचा पुरवठा कीटकनाशक विभागाच्या व्यतिरिक्त इतर विभागांच्या गाडय़ा तसेच कच-याच्या गाडय़ांनाही केला जातो. या कारणामुळे पंतनगर गॅरेजमधून उपलब्ध साठा लक्षात घेऊन डिझेलचा पुरवठा केला जातो, असे कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.
यावेळी सर्वच सदस्यांनी डिझेल घोटाळय़ाची चौकशी करण्याची मागणी करत सर्व नगरसेवकांच्या प्रभागात किती डिझेल धूर फवारणीसाठी दिले गेले व किती मिळायला हवे होते, याचा अहवालच सादर करण्याची मागणी आरोग्य समितीने केली आहे.