मुंबई ( जेपीएन न्यूज ) : सतत हाय ऍलर्ट असलेल्या मुंबई शहराच्या सुरक्षेचा गाडा मुंबई पोलीस सध्या अपुर्या मनुष्यबळावर हाकला जात आहे. पोलिस विभागात अंमलदारांपासून ते अधिकार्यांपर्यंत सुमारे अडीच हजार पदे रिक्त असून या रिक्त पदांमध्ये बहुतांश पदे एपीआय आणि पीएसआयची असल्याने गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांना प्रचंड अडचणी येत आहेत.
मुंबई पोलीस दलात मंजूर पदे किती आणि यापैकी किती पदे कार्यरत असून किती पदे रिक्त आहेत ही माहिती पुण्यातील माहिती कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जातून पुुढे आली आहे. या अर्जानुसार २०१४ मध्ये मुंबई पोलीस दलात एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त आणि २८ एसीपीची पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षकांची १०४७ पदे मंजूर असताना ९६२ पोलीस निरीक्षक सध्या कार्यरत आहेत. रिक्त पदांपैकी सर्वाधिक पदे ही एपीआय म्हणजेच सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ची आहेत. तपासाची कामे प्रामुख्याने हेच अधिकारी करतात. एपीआयची १४१ आणि पीएसआयची १०९६ पदे रिक्त असल्याने तपास कामाचा ताण पोलिसांवर पडत आहेत.
मुंबई पोलीस दलात अंमलदारांची मंजूर पदे ४० हजार ९१४ आहेत मात्र यापैकी ३९ हजार ७९१ अंमलदार सध्या कार्यरत आहेत. २०११ मध्ये ३ हजार १८८ अंमलदारांची पदे रिक्त होती. ही संख्या २०१४ मध्ये १हजार १२३ वर आली आहे. रिक्त पदांची संख्या कमी असली तर तपासासाठी आवश्यक असलेले एपीआय आणि पीएसआय यांची संख्या तुलनेने जास्त असल्याने तपासाच्या कामावर परिणाम होत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.